Saturday, 27 December 2014

व्यावसाईक दृष्टीकोण

 
Rich Dad Poor Dad या गाजलेल्या पुस्तकात छापलेली कथा -
एके काळी चारी बाजूनी सुंदर टेकड्यानी वेढलेले एक गाव होते. सुखसोई व समृध्दीने भरपुर गावात राहणारे नागरिक मोठ्या सुखाने आनंदात राहत होते. फ़क्त एकच अडचण होती ती म्हणजे पाणी. त्या गावातील प्रत्तेक कुटूंब त्रस्त होते ते एकाच गोष्टीने की त्याना पाण्यासाठी वणवण करत शेजारच्या टेकडीपलीकडे जावे लागायचे. गावातल्या बुजुर्ग लोकानी मिटिंग बोलावली आणि ठरवले की टेंडर काढायचे आणि कोणालातरी पाणी पुरविण्याचा ठेका द्यायचा. ठेकेदाराने गावाला दररोज पुरेल एवढे पाणी पुरवठा करायचा. यासाठी गावातूनच दोन निविदा आल्या आणि दोघानाही या कामाचा ठेका देण्यात आला. बुजुर्गाच्या निर्णयामागे एक गणित होते की दोघाना काम देण्यामुळे त्यांच्यात स्पर्धा वाढून दर आणि क्वालिटी टिकून राहील.
त्या दोघा ठेकेदारापैकी पहिला ठेकेदार त्याच दिवशी दुकानात जाउन दोन नवीन गॅल्व्हनाइज्ड बादल्या विकत घेउन आला आणि लगेचच पाणी आणण्याच्या कामाला लागला. त्याने दोन दोन बादल्या पाणी भरुन आणुन गावात बांधलेल्या पाण्याच्या हौदात ओतायला सुरुवातही केली. अशाप्रकारे लगेचच कमाई सुरु झाली. तो भल्या पहाटे उठुन आपल्या कामाला सुरवात करत असे जेणेकरुन जास्तित जास्त कमाई होऊ शकेल.
तो त्याच्या "हार्डवर्क"वर आणि होणा-या रोखीच्या कमाईवर जाम खुष होता.
तो दुसरा ठेकेदार कांही महीने गायबच होता. त्यामुळे पहीला खुष होता कारण सर्व कमाई त्यालाच मिळत असे.
दोन नवीन बादल्या विकत घेउन पहिल्याशी स्पर्धा करण्याऐवजी दुस-याने प्लॅन तयार केला, एक कंपनी स्थापन केली ज्यात चार इन्व्हेस्टर होते, कामगार होते आणि एक मॅनेजरही होता. सहाच महिण्यात तो परत आला आणि त्याने तळ्यातले पाणी मोठ्या पाइपमधुन थेट गावापर्यंत पोहचवले. आता पाणी फ़क्त साठवणीच्या हौदातच पडत नव्हते तर लोकांच्या घरी पोहचत होते, तेही पहिल्यापेक्शा शुध्द.
नवीन सिस्टिमच्या उद्घाटनावेळीच दुस-याने जाहीर केले की त्याचे पाणी आठवड्याचे सात दिवस चोविस तास सुरु राहील आणि जास्त शुध्द तरीही पहिल्यापेक्शा ७५% स्वस्त. मग काय लोकांनी आनंदोत्सवच साजरा केला. दुस-याची योजणा सफ़ल झाली.
पहिल्या ठेकेदाराने दुस-याशी स्पर्धा करण्यासाठी आपला दरही ७५% कमी केला. आणि होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी एकाचवेळी चार बकेट पाणी आणु लागला. आणि आपल्या दोघा मुलांनाही त्याने या कामात मदतीला घेतले. जेव्हा त्याची मुले कॉलेजला जाउ लागली तेव्हा त्याने त्यामुलांना सांगितले की लवकर परत या हाच बिझनेस तुम्हाला पुढे चालवायचा आहे.
मुले कॉलेजमधे रमली आणि पहिल्या ठेकेदाराला कामगारांचा तुटवडा भासू लागला. पगार थकू लागले. कामगार जास्त पगार मागु लागले आणि एकावेळी एकच बादली भरुन आणणार म्हणु लागले. अशाप्रकारे पहिल्याचा बिझनेस लडखडत राहिला. शेवटपर्यंत हार्डवर्क करण्याशिवाय पर्याय त्याच्याकडे नव्हता आणि लोकांची देणीही वाढली.
दुस-याने मात्र पाठोपाठ इतर गावांनाही पाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वीत केल्या आणि पाण्यासारखा पैसा मिळविला. तो आता मजेत राहतो कारण त्याच्याकडे काम करण्यासाठी लोक नेमलेले आहेत. 

आता स्वत:ला प्रश्न विचारा:
1. आपण काय करत आहोत?
2. पाइपलाइन टाकत आहोत कि बादलीने पाणी भरत आहोत?
3. मी हार्डवर्क करतो की स्मार्टवर्क करतो ?
 
सर्वाना स्मार्ट वर्क करायचे आहे.
पण ते करु शकत नाहीत. कारण स्मार्ट डिसिजन घेण्यात रिस्क असते. बिझनेस सेट करण्यात सहा महिणे-वर्ष वाया जाईल असे वाटते म्हणुन सगळेजण दोन दोन बादल्यानी पाणी भरत आहेत. बिझनेस किंवा गुंतवणुक करण्यात आपण मागे पडतो कारण दोन्हीतही आपल्याला रिस्क वाटते. भले आयुष्यभर नोकरी करु पण कोणताही छोटासा बिझनेस करणार नाही किंवा गुंतवणुक करणार नाही.
 
पण मित्रानो, म्हणतात ना Risk शिवाय Reward नाही. शंभरातले ५% लोक रिस्क घेतात आणि श्रीमंत बनतात, बाकी ९५% काठावरच्या गप्पा हाणतात.

Tuesday, 23 December 2014

सावध पाऊल


एक कथा आहे.
प्रशांत, हा गेली पाच सहा वर्षे मुंबईत एका सॉफ़्टवेअर कंपनीत नोकरी करत असतो. लहानपणापासुन मुंबईसारख्या शहरातच वाढल्यामुळे त्याचा ग्रामीण जीवनाशी किंवा शेतीशी कधीही संबध आला नाही. पण कांही कारणाने त्याचा संबंध शेजारच्या खेडेगावांशी आला आणि तो शेतीच्या प्रेमात पडला. त्याने नाशिकच्या व्हिजीट मध्ये द्राक्षाची शेती पाहिली आणि त्याने स्वत: द्राक्षाची शेती करण्याचे ठरवले. स्वत:च्या शेतात पिकणारी खुपसारी द्राक्षे प्रोसेसिंग कंपनीला विकुन मोठा नफ़ा मिळवायचा असा त्याचा प्लॅन होता.
त्याने नोकरीतून साठलेल्या पैशाने छोटसे शेत विकत घेतले आणि द्राक्षाची रोपे लावली. पण झाले असे की शेतीतला कोणताही अनुभव नसल्यामुळे त्याला या प्रयत्नात खुप मोठा तोटा झाला. त्याचे हात नुकसानीमुळे होरपळुन गेले. तो आता म्हणु लागला की " शेती करणे ही आयडीयाच चुकिची आहे आणि कोणीही शेती करुन पैसा कमवू शकत नाही"
 
प्रशांतसारखेच आपल्यापैकीही खुपजणांनी स्वत:च्या लिमिटेड माहितीच्या जोरावर फ़ायनान्शियल मार्केटमध्ये पैसे गुंतवले. फ़ायनान्शीयल मार्केटचे वास्तविक ज्ञान नसल्यामूळे खुप सा-या अफ़वा आणि कटू कथा तयार झाल्या - " शहाण्याने . . . च्या मार्गाला जाउ नये" . . . इत्यादी इत्यादी. त्यामुळे झाले असे कि जास्तप्रमाणात लोक आता फ़क्त एकदोन प्रकारची गुंतवणुक साधने वापरतात. पण अशा गुंतवणुकीतून त्यांच्या गरजा पुर्ण होऊ शकत नाहीत. महागाईचा दर १०% च्या वर पोहचला असेल तर गुंतवणुकीवर कमीतकमी किती रिटर्नस मिळायला हवेत हे ही पाहणे गरजेचे आहे.
 
असो, तर कालांतराने प्रशांतने कांही तज्ञ लोकांनाचा सल्ला घेतला, कांही अनुभवी लोक कामगार म्हणुन ठेवले आणि त्याच शेतीतून द्राक्षाचे पिक घेतले. आज तो मुंबईतच राहतो आणि त्याची शेती नाशीकमध्ये द्राक्षातून लाखो रुपये कमवून देते.
त्याच प्रकारे योग्य सल्ला, काटेकोर नियोजन आणि अभ्यासपुर्वक केलेली गुंतवणुक फ़ायदा करते. कोणतीही गुंतवणुक करताना त्याची सर्वंकष माहीती करुन घेतली पाहीजे आणि योग्य त्या एक्स्पर्टसना भेटले पाहिजे. कारण कितीही यशस्वी खेळाडू असला तरी त्यालाही कोचची गरज असतेच.
 
A Thought for Today: Public opinion can't be a substitute for the Expert's View.

Friday, 12 December 2014

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने



ॐ नमोजी आद्या! वेदप्रतिपाद्या!
जयजय स्वसंवेद्या! आत्म-रुपा!!१!!
                              - श्री ज्ञानेश्वरी
ॐ उशन ह वै . . .
                           - कठ-उपनिषद

ॐ या सच्चिदानंदघनस्वरुप परमात्म्याच्या नामस्मरणाने सुरुवात करु.


मित्रानो,
मनुष्यजन्मानंतर थोडीफ़ार समज आल्यावर आयुष्यात काय काय करायचे आहे याबाबत प्रत्तेकाची कांही स्वप्ने किंवा ध्येये असतात.
त्यापैकी एक म्हणजे स्वत:ला "आर्थिकदॄष्ट्या स्वावलंबी" बनविणे. स्वत:च्या पायावर उभे राहणे. यासाठी शिक्षण संपताच नोकरी करणे, स्वत:चा व्यवसाय सुरु करणे इ.
पुढचे स्वप्न म्हणजे "आर्थिकदॄष्ट्या सुरक्षित" बनने. यासाठी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या भविष्याच्यादृष्टीने आर्थिक सुरक्षिततेसाठी आयुर्विमा, पेन्शन प्लॅन, हेल्थप्लॅन, पिपिएफ़ इ. मधुन गुंतवणुक करणे.
आणि मुख्य स्वप्न हे " पुर्ण आर्थिक स्वातंत्र्य " मिळवणे. म्हणजेच कोणात्याही भौतिक श्रमाशिवाय पैसा मिळवता येणे हेच असते आणि असले पाहिजे. पण त्याद्रूष्टीने आपण खुपच कमी प्रयत्न करतो. जीवनात एक काळ असा आला पाहिजे की जिथुन पुढे आपल्याला कोणत्याही कष्टाशिवाय मुक्त जगता आले पाहिजे. आपल्याकडे मुक्तपणे फ़िरण्याइतका पैसा उपलब्ध झाला पाहिजे. आपल्याला मुलांसाठी वेळ देता पाहिजे आणि त्यासाठी लागणारा पैसा मिळत राहिला पाहिजे.
१)"आर्थिकदॄष्ट्या स्वावलंबी"
२)"आर्थिकदॄष्ट्या सुरक्षित"
३)"पुर्ण आर्थिक स्वातंत्र्य "
या मार्गावर चालत असताना अनेक बाबतीत सल्ला व माहितीची गरज असते. ती या ब्लॉगच्या माध्यमातुन पुरविणे हा प्रथम उद्देश्य आहे. हा ब्लॉग सुरुवात करण्यामागचा हेतु म्हणजे विविध आर्थिक विषयासंदर्भातील माहितीचे आदान प्रदान आणि चर्चा करणे. मी यासंदर्भात काम करत असुन, विविध विषयांची माहीती मिळवण्याचे काम करत आहे. विविध पुस्तके, मासिके, वेबसाइट्स, ब्लॉग्सच्या माध्यमातून मिळणारी माहीती आपल्यासोबत शेअर करुन त्यावर चर्चा करु इच्छितो.
मी स्वत:ही याच दिशेने प्रवास करत असल्यामुळे आपल्याकडील माहितीचा व होणा-या चर्चेचा मलाही फ़ायदाच होईल.
यातून आपल्या सर्वांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरळीत होईल हि अपेक्षा.